Shivajirao Patil – LOGO https://durgdemoweb.in A lighthouse of holistic education Sat, 16 May 2026 09:11:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 आमदार शिवाजीराव पाटील : व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व https://durgdemoweb.in/docs/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d/ https://durgdemoweb.in/docs/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d/#respond Sat, 16 May 2026 09:08:04 +0000 https://durgdemoweb.in/?post_type=docs&p=405 आमदार शिवाजीराव पाटील : व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व 

महाराष्ट्राच्या कर्मभूमीत सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या संदर्भात विचारसरणीचा तेजस्वी वारसा लाभलेले थोर महापुरुष उदयाला आले आणि आपल्या कर्तृत्वाने मानवजातीच्या उद्धारार्थ प्रेरणादायी जीवन जगले, अशा महापुरुषांपैकी शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील तथा दादा एक कर्तृत्ववान प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. 

शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील तथा ‘दादा’ यांना लाभलेला कौटुंबिक वारसा अत्यंत उज्ज्वल आणि वैभवशाली होता. त्यांचे आजोबा अर्थात विदर्भातील नगरपालिका असलेले खामगाव जि. बुलढाणा येथील जमीनदार खंडेराव बोबडे होते. त्यांना ९०० एकर जमीन होती. एक बागायतदार शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला होता. अर्थात दादांचे आजोळ सर्वांगाने आणि सर्वार्थाने अत्यंत श्रीमंत होते. घोडागाडी, बग्गी, नोकर-चाकर आणि विशाल हवेलीवजा मोठा बंगला अशी वैभवसंपन्नता त्यांना लाभली होती. त्यांचे बंधू बाजीराव बोबडे विदर्भातील नावाजलेले ख्यातनाम वकील होते. त्यांचा वकिली क्षेत्रातील लौकिक सर्वांच्या आदराचा आणि आस्थेचा विषय होता. खंडेराव बोबडे ह्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. त्यापैकी ज्येष्ठ कन्या भागीरथी ह्या दादांच्या मातोश्री. भागीरथीबाईंचा जन्म बोबडे कुटुंबात प्रथम झाला म्हणून त्या सर्वांच्या लाडक्या होत्या. भावाचे नाव प्रतापराव आणि बहिणीचे नाव वत्सला असे होते. अशी तीन अपत्ये. बाजीरावांना चार मुले आणि तीन मुली होत्या. दोन्ही भाऊ प्रतापराव आणि शंकरराव एकत्रीत राहत होते, कुटुंब मोठे होते. शंकरराव पुढे खूप वर्षे खासदार होते. नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष होते. अत्यंत वैभवशाली आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित झालेल्या प्रगतशील शेतकरी कुटुंबातील खंडेराव बोबडे ह्यांची ज्येष्ठ सुकन्या भागीरथीबाई आणि मंचरचे थोर शिक्षण महर्षी भाऊराव गेणूजी पाटील ह्यांच्या पोटी दिनांक १२ नोव्हेंबर, १९२९ रोजी दादांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगावी झाला. दादांना हा वैदर्भीय वारसा लहानपणापासूनच लाभला होता. विदर्भातील उदात्त गुण दादांच्या व्यक्तिमत्त्वात उतरले होते. वैदर्भीय मनाचा मोठेपणा आणि विशालता, दानशूरता आणि विचारशीलता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव झाला होता. त्यांची राहणी साधी असली तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वैभवसंपन्नतेची झालर होती. हे गुण जणू त्यांच्या मातेच्या उदरातूनच त्यांना उपजत प्राप्त झाले होते. त्यांचे काही वर्षांचे बालपण खामगावीच गेले होते. 

दादांचे वडील भाऊराव गेणूजी पाटील तथा बी. जी. पाटील उच्च विद्याविभूषित होते. त्यांचे बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाले होते. त्यांचा भाऊ आजारी पडल्यामळे त्यांना एल. एल. बी. ची शेवटची परीक्षा देता आली नाही. अर्थात वकिली करता येणार नाही, हे निश्चित झाले होते. भाऊरावांनी शिक्षक व्हायचे ठरविले. त्यांना नाशिकला हायस्कूलवर नोकरी मिळाली. पगार महिना रुपये ४० असा होता. भाऊरावांनी आपले कुटुंब नाशिकला हलविले. लवकरच त्यांना वणीच्या श्री. रावसाहेब थोरात ह्यांनी महर्षी शिंदे ट्रेनिंग कॉलेज, नाशिक येथे प्राचार्य म्हणून नियुक्त केले. त्यामुळे दादांचे बालपण व प्राथमिक शिक्षण नाशिकला झाले. शिवाजीराव पाटील हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. 

सन १९४७ ला देश स्वतंत्र झाला. “कसेल त्याची जमीन’ असा कायदा आला म्हणून भाऊरावांना नाशिक सोडून मंचरला यावे लागले. त्यांनी मंचरचा शैक्षणिकदृष्ट्या कायापालट कारायचे ठरविले. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांचे अनुयायित्व स्वीकारून त्यांनी रयत शिक्षण संस्थेला वाहून घेतले. त्यांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणाचा उदंड वारसा दिला. दादांचे माध्यमिक शिक्षण मंचरलाच झाले. 

महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे प्रवेश घेतला आणि बी. ए. ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची पायलट म्हणून निवड झाली होती. परंतु दादांचे पिताश्री कर्मवीर भाऊराव पाटलांचे अनुयायी होते. कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास दादांनी तरुणपणातच अनुभवला होता. शिवाय त्यांनी ‘संस्थेच्या कार्याला आजन्म वाहून घ्यावे,’ अशी तीर्थरूप कर्मवीर अण्णांची मनिषा होती. स्वाभाविकपणे श्रेष्ठांच्या मनोकामनेचा आदर करून दादांनी शिक्षक होण्याचे मनोमन ठरविले. त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे त्यांनी बी. टी. करण्यासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रनिंग, क्रॉसकंट्री, फुटबॉल, स्विमिंग, कुस्ती, वेट लिफ्टींग इत्यादी खेळात प्राविण्य संपादित केले आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला. 

जडणघडणीच्या या काळात त्यांनी फार मोठा मित्र परिवार मिळविला आणि तो आयुष्यभर जपला. सातारा येथे असताना त्यांनी अण्णांच्या ‘कमवा आणि शिका’ ह्या योजनेतूनच शिक्षण घेतले. त्या काळापासून त्यांच्या कानामनावर कर्मवीर अण्णांच्या विचारांचा विलक्षण प्रभाव पडला. बॅ. पी. जी. पाटील, बॅ. सौ. सुमतीबाई पाटील, डॉ. एन. डी. पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांचे त्यांना विचारसानिध्य लाभले. त्यांनी ह्याच काळात प्राचार्य नारायणराव भगरे (पंढरपूर), श्री. खवरे (वाळवा), प्रा. केरूळकर (पुणे), श्री. शिंदे सरकार ( पुणे), श्री. भालू भागवत, श्री. ए. के. घोरपडे (सातारा) अशी जिवलग मित्रमंडळी जोडली. याच काळात त्यांनी भटकंती, गाठीभेटी, संघटना, मित्रमंडळे स्थापन करून विचारांचे आदानप्रदान केले आणि आपल्या नेतृत्वगुणांचा विकास केला. त्यांचा शैक्षणिक प्रवास हा ऊर्जा अर्जित करणारा उपक्रम होता. भविष्याचा वेध आणि वर्तमानाचे भान त्यांनी कधीच सुटू दिले नाही. प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने ठेवण्याचा त्यांचा ध्येयध्यास हा विलक्षण होता. भान ठेवून योजना आखणे आणि बेभान होऊन तडीस नेणे असा त्यांचा दुर्दम्य उत्साह कधीच क्षमला नाही. वाशिम येथील डॉ. गोविंदराव चव्हाण यांची सुकन्या डॉ. लीलाबाई ह्यांच्या बरोबर त्यांचा विवाह २५ मे, १९५७ रोजी झाला. पत्नी सेवाभावी, सुलक्षणी आणि व्यवसायाने डॉक्टर असल्याने दादांच्या जीवनात लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या पत्नीने दादांच्या कार्याला सर्वार्थाने वाहून घेतले. त्यांचे आचारविचार ध्यानी घेऊन त्यांच्या संकल्पित कार्याला सदैव परिश्रमपूर्वक आणि नियोजनपूर्वक साथ दिली. 

शैक्षणिक व सामाजिक कार्य 

‘“शिक्षणाने नवसमाज निर्मिती करता येते”, असे शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांनी प्रतिपादन केले होते. त्यानुसार बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा, ह्या उदात्त हेतूने मंचरसारख्या ग्रामीण भागात भाऊराव गेणूजी पाटील यांनी इ.स. १९५० साली महात्मा गांधी विद्यालय सुरू केले. इमारत नसल्याने गावातील जुने वाडे, मंदिरे ह्या ठिकाणी वर्ग भरत असत. वडिलांच्या इच्छेनुसार आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या उपदेशानुसार शिवाजीराव पाटील तथा दादा रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाच्या भूमिकेला अनुसरले. अल्पावधितच त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. वक्तशीरपणा, सचोटी, प्रयोगशीलता, खिलाडूवृत्ती आणि नीटनेटकेपणा इत्यादी गुणांच्या जोरावर एक ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून त्यांनी संस्था पातळीवर लौकिक संपादन केला. महाळुंगे पडवळ, विंचूर, हडपसर व मंचर इत्यादी ठिकाणी त्यांनी एक यशस्वी प्राचार्य म्हणून अलौकिक असे यश संपादन केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचाच एक निष्ठावान अनुयायी म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या विकास आणि विस्तारकार्यास दादांच्या मार्गदर्शनाचा निश्चित लाभ झाला. 

महाळुंगे पडवळ येथे विद्यालयाच्या इमारतीसाठी जागा मिळवून प्रत्यक्ष इमारत उभी करण्यापर्यंत ग्रामस्थांचा सर्व प्रकारचा सहभाग आणि सहकार्य मिळविण्यात दादा यशस्वी झाले. अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी विद्यार्थिनींना दादांनी येथे घडविले. श्री. के. डी. शिंदे, श्री. बळीराम आवटे व श्री. आर. टी. पोखरकर ह्यासारखे उच्चपदस्थ अधिकारी दादांनी येथे घडविले. विंचूर (नाशिक) सारख्या ठिकाणी माळरानावर विद्यामंदिर उभारण्याचे काम करून एक आदर्श निर्माण केला. अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असताना उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी म्हणून स्वतःच्या रचनात्मक कार्याचा ठसा उमटविला. स्वतंत्र बाण्याचे, करारी वृत्तीचे परंतु तेवढेच प्रेमळ असणारे प्रशासक म्हणून नेत्रदीपक अशी कामगिरी केली. वडिलांच्या शिक्षणप्रसार कार्याचा वसा व वारसा अतिशय समर्थपणे चालविण्याचे कार्य दादांनी अविरतपणे केले. कर्मवीरांच्या संस्कारात वाढल्याने एक व्रतस्थ प्राचार्य व कुशल प्रशासक म्हणून दादांनी रयत परिवारात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचीच परिणती म्हणून पुढे रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 

दादांचा सुवर्णकाळ म्हणजे साधना विद्यालय, हडपसर येथे त्यांनी केलेली शिक्षण साधना होय. खडक फोडून त्यावर ज्ञानमंदिर उभारण्याचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करत सेवक सदनिका बांधण्याचे प्रयोगशील कार्य दादांनी साधना विद्यालयात केले. शालेय परिसरात राहिल्याने कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव देण्याचे काम व अधिकचा वेळ देण्याचा हेतू सफल होतो. विद्यार्थी, शिक्षक व समाजाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. आदर्श शैक्षणिक संकुल म्हणून विकास करताना, जलतरण तलाव, प्रशस्त मैदान, ग्रंथालय, क्रीडा संकुल आदी सुविधा प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण केल्या. स्वतः स्वावलंबनाचे धडे देत विद्यार्थी वर्गात लोकप्रियता मिळवून समाजप्रेमी प्राचार्य म्हणून कीर्ती संपादन केली. त्यांच्या हातून पुणे येथील मुख्याध्यापक भवन, शिक्षक संघटना, शिक्षकांच्या समस्या, सेवाशाश्वती, शिक्षणासंबंधी चळवळ इत्यादी कार्य साधना विद्यालयात असतानाच झाले. त्यातूनच विधानपरिषदेवर शिक्षक आमदार म्हणून १९८४ साली ते निवडून आले. त्यांनी सभागृहात अभ्यासपूर्ण भाष्य करणारे शिक्षक प्रतिनिधी म्हणून नावलौकिक मिळविला. तसेच विविध विषयांवर प्रश्न विचारून शिक्षण क्षेत्राला एक दिशा दिली. ते एक दूरदर्शी नेता म्हणून उदयाला आले. याच काळात शेतकरी व कामगार ह्यांच्या समस्या मांडणारे प्रभावी आमदार म्हणून ख्याती मिळविली. शाळा मान्यतेचे निकष आणि त्या प्रश्नातील अडचणी दूर करत अनेक शाळांना मान्यता मिळवून देण्याचे कार्य केले. त्यातूनच विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणारे शिक्षक आमदार म्हणून त्यांची सभागृहाला ओळख झाली. 

मंचर ही दादांची जन्मभूमी आंबेगाव तालुक्यात असल्यामुळे त्यांनी नाला बंधारे, केटी बंधारे बांधले. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न निकालात निघाला. असा दूरदृष्टिकोन मनी मानसी बाळगून शेतीला पाणीपुरवठा केला. त्यातून त्यांचा सामाजिक दृष्टिकोन किती व्यापक होता ? याचे प्रत्यंतर येते. आज आंबेगाव तालुका हिरवागार पहावयास मिळतो त्यासाठी दादांनी अपार कष्ट घेतले आहेत. मंचर येथे महात्मा गांधी विद्यालय इमारत बांधकाम, मैदान विस्तार, स्वतंत्र प्रयोगशाळा इत्यादी कामात लक्ष घालून साधना विद्यालयाप्रमाणे एक आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय साकारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दादांनी केले. प्राथमिक विद्यालय आणि सेमी इंग्लिश स्कूलचे वर्ग त्यांनी प्रथम मंचर येथे सुरू करून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण व इंग्रजी शिक्षणाची सोय केली. आज एक दर्जेदार विद्यालय म्हणून शासन दरबारीसुद्धा मंचरची दखल घेतली जाते. यात दादांच्या दूरदर्शीपणाचा प्रत्यय येतो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी दादांनी खूप नियोजनपूर्वक मार्गदर्शन केले. आजही त्या गुणवत्तेचा लौकिक संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे. ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असताना मंचर येथील विस्तारित अठरा खोल्यांची इमारत पूर्णत्वाला गेली. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक रयत सेवकांना प्रेरणा मिळाली आणि मार्गदर्शनाचा उपयोग झाला. अनेक प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक, लेखनिक, सेवक व कर्मचारी ह्यांना दादांचे सर्वप्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. 

अण्णासाहेब आवटे महाविद्यालय हे उत्तर पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. त्याच्या उभारणीत १९६६ पासून दादांनी सक्रिय सहभाग घेतला. महाविद्यालयाचा विस्तार आणि विकास आज एकशे पाच एकर क्षेत्रात झाला आहे. पुणे विद्यापीठात ह्या महाविद्यालयाचा लौकिक वाढविण्याठी दादांनी सदैव कृतियुक्त मार्गदर्शन केले. प्रत्येक विकास कामात आपला सहभाग दाखविला. सेवानिवृत्तीनंतरही जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी आपल्या विकासकार्यात अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. तरुणांच्या आशा- आकांक्षाचे स्फूर्तिस्थान म्हणून ते ह्या महाविद्यालयाकडे पाहत असत. 

निवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षक संघटनांना दिशा दिली. मोर्चे, आंदोलने करुन लढा उभारला व शासनदरबारी सनदशीर मार्गाने प्रत्येक शैक्षणिक प्रश्न मार्गी लावला. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या पटांगणावर अखिल महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्यांच्यासमवेत नेतृत्व करत शिक्षक संघटनेला गती आणि दिशा दिली. शासन स्तरावर केलेल्या कामांपैकी सेवा शाश्वती, ग्रंथालय अनुदान, विनाअनुदान शाळासंबंधी अनेक प्रश्नांचा त्यांनी पाठपुरावा केला. ९० च्या दशकानंतर शाळाशाळांतून मार्गदर्शन करत शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे काम दादांनी सातत्याने केले. सामाजिक कामातही त्यांनी सहभाग घेतला. मा. खासदार किसनराव बाणखेलेंसारखे नेतृत्व उभे करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामध्ये गुरु-शिष्य नाते होते. मंचरसारख्या वाढत्या शहरात सदैव शांतता राखण्यासाठी शांतता कमिटीच्या माध्यमातून लोकसमूहाला एक शिस्त लावून दिली. सार्वजनिक उत्सव, सण-समारंभ, इत्यादी प्रसंगी दादांचे मार्गदर्शन लोकसमूहाला दिशादर्शक ठरत असे. मंचरच्या प्रत्येक ग्रामसभेला ते उपस्थित राहत व मार्गदर्शन करत. समाज बांधणीचे महत्त्व लक्षात घेता दादांनी एकूण शिस्त, कामाची नियोजनपूर्वक आखणी इत्यादी बाबींवर जोर दिला आणि मार्गदर्शन करताना विविध प्रकारचे समर्पक असे दृष्टान्त, दाखले देऊन त्यांनी सामाजिक उद्बोधन केले. 

त्यामुळे त्यांची छोटी छोटी भाषणेसुद्धा समूहाला अचूक दिशा देणारी ठरली आणि सुदृढ समाज निर्माण झाला. सामान्य जनतेलाही त्यांचे निवासस्थान ‘शिवनेरी’ मोठा आधार वाटे. हितोपदेश देणारे, सर्वांना प्रेरणा देणारे आणि प्रबोधन करणारे वास्तुकेंद्र म्हणून त्यांचा “शिवनेरी” हा बंगला ठरत आहे. ग्रामस्थांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करून त्यांनी चांडोली बुद्रुक आणि वडगाव काशिंबेग येथे मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भाग शाळा प्रयत्नपूर्वक काढल्या. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ते सतत झटले. आसाणे, माळीण, जांभोरी येथे रयत शिक्षण संस्थेची विद्यालये उभी केली. नारोडी येथील मुक्तादेवी विद्यालय व रांजणी येथील नरसिंह विद्यालय या खासगी शाळा होत्या. त्यांनी ग्रामस्थांचे सहकार्य मिळवून त्या शाळा रयत शिक्षण संस्थेला जोडल्या. 

थोडक्यात आज आंबेगाव तालुक्याचा जो शैक्षणिक आणि सामाजिक विकास झाला त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सर्वाधिक शाखा आंबेगाव तालुक्यात सुरू करण्यात दादांचे पिताश्री भाऊराव गेणूजी पाटील आणि स्वतः दादांचे मोठे योगदान आहे. तालुक्याच्या विकासात पाटील घराण्याचे कृतियुक्त योगदान अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. 

क्रीडाप्रेम आणि धोरण 

दादांना खेळांची खूप आवड होती. महाळुंगे पडवळ येथे सन १९६३ ते ६८ च्या काळात त्यांनी खेळाडूंना स्पाईक्स शूज, शॉर्टस्, टीशर्टस्, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग कीट इत्यादी उपलब्ध करून दिले आणि ग्रामीण भागात प्रथम शहरी खेळांची आवड निर्माण केली. डबलबार, सिंगलबार मैदानावर उभारले होते. व्यायाम साहित्यही त्यांनी खेळाडूंना उपलब्ध करून दिले. खेळाच्या बाबतीत महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचा दबदबा होता. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि मैदानी स्पर्धांमध्ये खेळाडू निष्णात असत. एन.सी.सी., आर्मी आणि नेव्हीचे विभागही सुरू केले. 

हडपसर येथे साधना विद्यालयात जिम्नॅशियम, स्विमिंगपूल, प्रशस्त मैदान आणि मुबलक खेळ साहित्य आणि इतर सुविधा त्यांनी खेळाडूंसाठी पुरविल्या होत्या. कर्मवीर क्रीडामंडळालाही त्यांनी ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. श्री. पी. डी. राऊत, श्री. सूर्यवंशी एस. ए. व श्री. साळुंखे तात्यासारखे क्रीडाप्रेमी उभे केले होते. त्यांना खूप प्रोत्साहन दिले. फुटबॉल, हॅन्डबॉल आणि कबड्डीचे अनेक कसदार संघ तयार केले. 

इ.स.१९८६ ला क्रीडाप्रेमी दादा मंचरला प्राचार्य म्हणून आले. महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मंचर येथील दोन टप्प्यात असलेल्या मैदानाचे सलग एकत्रीकरण करून सपाटीकरण केले. त्यावर कबड्डी खो-खो, व्हॉलीबॉलची मैदाने तयार केली. 

एकदा खेळाच्या मैदानावरून फेरफटका मारताना त्यांनी क्रीडासाहित्याच्या खोलीत प्रवेश केला. क्रीडाशिक्षक श्री. टी. डी. जाधव तेथे उपस्थित होते. त्यांनी विनयाने खेळ साहित्य दादांना दाखविले. दादा म्हणाले, “सर, साहित्य मांडणी छान आहे. परंतु वापरून बाद झालेले साहित्य कोठे आहे ?” जाधव सरांना बाद साहित्य दाखविता आले नाही. दादा उद्गारले, “साहित्य फक्त जपून ठेवू नका सर ! खेळाडूंना द्या. तुटू द्या, खेळाडूंना साहित्य कमी पडता कामा नये. आपण नवीन साहित्य खरेदी करू.’” बाजूला उपस्थित असलेल्या श्री. बाळासाहेब खानदेशे ह्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘खेळाडू तयार झाले पाहिजेत. त्यासाठीच तर तुम्ही येथे आहात.” ह्या प्रसंगावरुन दादांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. श्री. बाळासाहेब खानदेशे आणि सौ. कमल खानदेशे ह्यांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन महात्मा गांधी विद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकवले आहेत. खेळाडूंच्या विजयाची वार्ता दादांनी ऐकली की ते शिक्षक आणि खेळाडूंच्या पाठीवर हात ठेवून कौतुक करायला विसरत नसत. श्री. बाळासाहेब खानदेशे ह्यांनी दादांच्या प्रेरणेने मंचर येथे महाराणा प्रताप संस्था स्थापन केली. दादांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कबड्डी, खो-खो आणि मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. खेळासंबंधी त्यांचे धोरण उदारमतवादी होते. खेळाडूंना चांगली व्यायामशाळा असावी, चांगले जिम्नॅशियम असावे म्हणून मंचर येथे त्यांनी बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली. त्यासाठी केंद्रसरकारकडून निधी मिळविला. उत्कृष्ट हॉलची निर्मिती त्यांच्याच प्रेरणेने झाली. 

क्रीडास्पर्धांना ते नेहमी भेट देत. सामने पाहणे, पुढे काय होईल? ह्याचा अंदाज बांधत ते खेळाची समीक्षा करत. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. खेळाविषयी त्यांच्या मनात कमालीचे आकर्षण होते. खेळाचे प्रेम त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मनात आस्था निर्माण करून जोपासले होते. धावण्याचे महत्त्व त्यांनी त्यांचे चिरंजीव अभयला सांगितले होते. अभय धावण्यात हरणाची बरोबरी करेल असा चपळ होता. तो सी. एस. एम. होता. त्याने दिल्लीला आर. डी. परेड अर्थात रिपब्लिक डे परेड केली होती. त्यांचे चिरंजीव उदय आणि त्यांचे सर्व कुटुंब योगासने आणि प्राणायाम नियमित करणारे आहेत. त्यांची योगिक जीवनशैली अभिनव आहे. 

तरुणांना आदेश देताना ते नेहमी म्हणत, “मन, मनगट आणि मस्तकाचा विकास करावयाचा असेल तर तुम्हाला खेळण्यावाचून पर्याय नाही.’ ‘तरुणांचा आहार उत्तम असावा, शरीर सुदृढ असावे, खेळाडूंनी चांगली पुस्तके वाचावीत, वाचनालयात जावे’, अशी त्यांची शिकवण होती. “व्यायामात मन गुंतून ठेवले की माणूस व्यसनात गुंतत नाही’,असे ते नेहमी सांगत. दादांची शरीर प्रकृत्ती उत्तम होती. सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी ते उत्तम व्हॉलीबॉल खेळले. क्रीडाशिक्षक श्री. बाळासाहेब खानदेशे ह्यांनी मारलेला स्मॅश त्यांनी एका हाताने रिटर्न केला होता. त्यांची शारीरिक क्षमता अफाट होती. 

नियमित व्यायाम करणे ही त्यांची नित्याची सवय होती.” ज्या देशाची मैदाने खेळाडूंनी सतत गजबजलेली असतात त्या देशाच्या सीमांवर महायोद्धयांची कमतरता भासत नाही,’असे ते नेहमी म्हणत. 

सामुदायिक विवाह चळवळ 

अलीकडच्या काळात सामुदायिक विवाहाचे अनेक सोहळे आयोजित केले जातात. वधुवरांना संसारोपयोगी साहित्य, मणी-मंगळसूत्रही दिले जाते त्यासाठी वधुवरांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. वराचे वय २१ तर वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असावे लागते. वधुवरांची शारीरिक व मानसिक अवस्था लग्नासाठी अनुकूल असावी, अशी त्यामागील कायद्याची भूमिका असते. 

सामुदायिक विवाह चळवळ आणि तिची अपरिहार्यता दादांनी स्वतः रचनात्मक कार्य करून सिद्ध केली होती. हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचे प्राचार्य असताना महाळुंगे पडवळ येथे त्यांनी दिनांक २९ फेब्रुवारी १९६४ रोजी पाच जोडप्यांचा विवाह सामुदयिकरीत्या लावून दिला होता. शिवाय हा सामुदायिक विवाह विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पार पडला. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांचे चरित्रलेखक व प्रसिद्ध वक्ते श्री. ए. के. घोरपडे ह्यांनी मंगलाष्टके म्हटली होती. फोटोसाठी पुण्याचे सिसोदे फोटोग्राफर म्हणून उपस्थित होते. त्या विवाह सोहळ्याचे फोटो उपलब्ध आहेत. रयत शिक्षक श्री. वि. शं महामुनी ह्यांचा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडला. ते ह्या घटनेचे साक्षीदार आहेत. 

दादांचे सांस्कृतिक कार्य 

शिवाजीराव दादा हे व्यक्तिमत्त्व असे होते की, स्वतः कोणाला काही सांगण्याबरोबरच इतरांचे विचार ऐकण्यात त्यांना रस होता. जेथे काही चांगलं ऐकायला मिळेल ते कान देऊन ऐकत असत. मग ते एखाद्या नामांकित वक्त्याचे भाषण असो की एखाद्या विद्यार्थ्याचे निरोप समारंभातील मनोगत असो. त्याचे मुद्दे काढत आणि आवर्जून त्यांचा उल्लेख स्वतःच्या भाषणात ते करीत असत. मंचर येथील शिव व्याख्यानमाला असो की अण्णासाहेब आवटे कॉलेजवर एखाद्याचे भाषण असो दादांची हजेरी त्या ठिकाणी सौभाग्यवती वहिनींना घेऊन असायची. कारण वहिनींनाही त्याची आवड असायची. एखादा वक्ता आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडत असताना दादा त्याला दाद द्यायचे, एवढेच नव्हे तर इतर शाळेतील, कॉलेजमधील शिक्षकांना ते “अमूक वक्त्याला बोलवा आणि त्यांचे विचार मुलांना ऐकवा.” असे नेहमी सूचवत. अनेकवेळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते त्यांच्या घरी वास्तव्यास असत व परिसरातील शाळा कॉलेजात मुलांना व्याख्याने देत असत. 

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संदर्भात त्यांना आपली आवड फार जवळून जरी जोपासता आली नसली तरी पारितोषिक वितरण समारंभावेळी त्यातील सहभागी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक त्यांच्याकडून होत असे. महात्मा गांधी विद्यालय व प्राथमिक विद्यालय, मंचर यांनी सादर केलेले कार्यक्रम ते पाहायचे आणि खूप प्रेमाने त्या मुलांना जवळ घेऊन त्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे कौतुक करायचे. त्यांना खाऊसाठी रोख रक्कम द्यायचे. रयत शिक्षण संस्था, सातारा येथे ९ मे रोजी अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला रात्री १२ वाजेपर्यंत हजेरी लावणारे दादा आम्ही सर्वांनी पाहिले आहेत. 

स्वतः एक उत्तम खेळाडू असल्यामुळे खेळाडुंविषयी त्यांना विशेष आत्मियता असायची. ते स्वतः विजयी खेळाडूंचे कौतुक करायचे व इतर मुलांनाही खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे. सांस्कृतिक असो वा क्रीडा समारंभ असो असे उद्घाटन हे दादांनीच करावे अशी सर्वांची इच्छा असायची व पारितोषिक त्यांच्या हातून मिळावे, आपले कौतुक व्हावे असं विद्यार्थ्यांनाही वाटायचे. कलादालनाचे उद्घाटन जेव्हा दादा करायचे तेव्हा टाकाऊपासून टिकाऊ काही वस्तू पाहिल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे व आश्चर्याचे स्मित हास्य असायचे. 

‘वाचाल तर वाचाल’ ह्या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय त्यांच्या वाचनाच्या व्यासंगातून दिसायचा. किती आणि काय काय वाचले ? याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणातून, लेखनातून व चर्चेतून यायचे. अनेक उदाहरणे त्या वाचनातील असायची. अगदी लेखक, पुस्तकाचे नाव, पान क्रमांकासह उल्लेख असायचे. विद्यार्थ्यांनीही नेहमी वाचन करावे असा त्यांचा आग्रह असायचा. नामांकित लेखकांची पुस्तके त्यांच्या संग्रही असत. नित्यनेमाने त्याचे वाचन ते करायचे. त्यातील विशेष मजकूर अधोरेखित करण्याची त्यांना सवय होती. त्याचे टिपण काढत व प्रसंगानुरूप ते त्याचा उल्लेख करत असत. अगदी कोणतेही वाचनीय साहित्य दादांकडे येवो, मग एखादा शैक्षणिक क्षेत्रातील शासनाचा जी. आर. असो, एखाद्या संघटनेची कार्यपुस्तिका असो किंवा शैक्षणिक संघटनांचे अंक असोत, सगळं अगदी बारकाईने ते वाचत असत. रात्री उशिरापर्यंत लेखन, वाचन करणे, पहाटे ४ वाजता उठून पुन्हा वाचन लेखन करणे असा त्यांचा नित्यक्रम असे. कारण एवढा मोठा सामाजिक शैक्षणिक प्रपंच सांभाळूनही ते वाचन संस्कृती जपत असत. त्यांचे हस्ताक्षर मोत्याप्रमाणे स्वच्छ व सुंदर होते. 

वाचक म्हणून दादांनी आपली श्रीमंती जोपासली. “साहित्य, कला, संस्कृती, संगीत, नाट्य ह्यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा, पोटापाण्यासाठी हा उद्योग तुम्हाला जगवेल. पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल,” असे ते नेहमी म्हणत. त्यांची सुखाची कल्पना ‘परिपूर्ण दुसऱ्यांसाठी जगणं’ अशी होती. एकसंघ संस्कृती जपण्याचा दादांचा आग्रह असायचा आणि म्हणूनच मंचरमधील मुस्लीम बांधवांच्या सणांना त्यांना बधाई देण्यासाठी, त्यांच्यात सहभागी होण्यासाठी त्यांच्या इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित राहून दादा सांस्कृतिक सलोखा जपत. मंचरच्या धार्मिक व सांस्कृतिक जडणघडणीतही दादांचा मोठा वाटा असे. मराठी साहित्याची आवड असणारे, त्याच्याशी निगडित असणारे दादा म्हणजे एक सांस्कृतिक रसायनच होते. 

संघटनात्मक कार्य 

महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे लाडके नेते शिक्षक आमदार व महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी. डी. एफ.) चे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील हे एक कुशल संघटक होते. 

महाराष्ट्राच्या मातीला समाजसुधारणेचे बाळकडू देणाऱ्या शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा व कर्मवीर भाऊराव पाटील. प. पू. डॉ. बापूजी साळुंखे, गो. ग. आगरकर ह्यांच्या शैक्षणिक त्यागाचा वारसा त्यांना लाभला होता. हाच वसा व वारसा पुढे समर्थपणे पेलण्याचे कार्य उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या शिवाजीराव पाटील ह्यांनी केवळ चालविलाच नाही तर शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देण्याचे प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्राचा पैलू असलेल्या शिक्षकालादेखील संघटनात्मक ताकद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात विचारांची व कार्याची नवी क्रांतीच दादांच्या समर्थ नेतृत्वाने घडवून आणली. हजारो शिक्षकांनी दादांना केवळ आदर्शच मानले नाही तर एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले. संघटना उभारताना व संघटनेला दिशा देण्यासाठी दिशादर्शक, करारी, धाडसी व स्वाभिमानी नेतृत्वाची आवश्यकता असते. असे सर्वगुण नेतृत्व म्हणजे दादा होते. सर्व शिक्षकांचे नेते असलेले दादा हे राज्यातील सर्व शिक्षकांसाठी चालते बोलते विद्यापीठच होते. राज्यातील शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या संघटनांवर अत्यंत तत्परतेने, धाडसाने निर्णय घेऊन त्यांनी आपल्या सक्षम कर्तृत्वाची छाप शिक्षकांच्या मनःपटलावर उमटवली आहे. दादा म्हणजे एकमेवाद्वितीय नेता, कणखर नेतृत्व, परखड विचार व निर्णय घेण्याची महान क्षमता इत्यादी गुणांमुळे चळवळीत पदाधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचा ठसा शिक्षक चळवळींवर प्रकर्षाने उमटलेला आहे. महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) ह्यासह विविध संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाच्या कालखंडात मुख्याध्यापक व शिक्षकांच्या संघटनामध्ये समन्वय निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. 

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा ते कोकण व नाशिक, धुळे ते सिंधुदुर्ग एवढ्या मोठ्या भौगोलिक प्रदेशात शिक्षक व मुख्याध्यापक जगतावर त्यांच्या समर्थ नेतृत्वाची छाप होती. त्यांच्या कामाचा झपाटा व लढवय्या बाणा लक्षात घेऊन महाराष्ट्र टी.डी.एफ.ने त्यांना सन १९८३ मध्ये पुणे विभागातून टी. डी. एफ. ची उमेदवारी दिली. त्या उमेदवारीच्या काळात त्यांना महाराष्ट्रातील विविध पुरोगामी संघटनांनी पाठिंबा दिला. त्यांचे माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक व टी.डी.एफ. चे हजारो कार्यकर्ते कामाला लागले आणि दादा महाराष्ट्र विधानपरिषदेवर शिक्षकांचे आमदार म्हणून निवडून आले. 

विधानपरिषद सदस्य ह्या नात्याने त्यांनी शिक्षकांच्या व समाजाच्या अनेक समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले. त्यांच्या मांडणीमध्ये अभ्यासूवृत्ती, अन्यायाची चीड व विधायकता दिसून यायची. ह्या कालखंडामध्ये विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांनी डोके वर काढले होते. अल्प वेतनावर काम करणाऱ्या हजारो प्रशिक्षित पदवीधरांचा प्रश्न गंभीर होता. सदर प्रश्न विधानपरिषदेत चर्चेचा विषय होण्यासाठी त्यांनी विधानपरिषदेतील शिक्षक आमदारांच्या तसेच बाकी सहकारी आमदारांच्या मदतीने विनाअनुदानित शाळांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्याचा आग्रह धरला. सन १९८३ ते ८९ या कार्यकाळात विधानपरिषदेत सुमारे ३२ विषयांवर शिक्षक व शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर यशस्वी चर्चा घडवून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

दादा पुणे विभागातून आमदार म्हणून काम करत असताना विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा करून त्यांनी ते प्रश्न सोडविले. विधिमंडळात त्यांनी शिक्षकांचे केवळ नेतृत्वच न करता शिक्षणातील बदलणारे संदर्भ, नवीन शैक्षणिक धोरण व शैक्षणिक विकास आराखडा ह्यावर अभ्यासपूर्ण निवेदने केलीत. त्याबरोबर दुर्गम भागातील आश्रम शाळांचे प्रश्न, त्यांची मान्यता व अनुदान, विनाअनुदानाचा प्रश्न, ग्रामीण भागातील शिक्षकांचे घरभाडे भत्ता, चौथा वेतन आयोग, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वेच्छानिवृत्तीची योजना तसेच वैद्यकीय सेवेची सुविधा असे कितीतरी प्रश्न दादांनी विधिमंडळात पुराव्यासह व अभ्यासपूर्ण भाषणाने सोडविले आहेत. विधानपरिषदेत विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे, शिक्षक व शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते, एक अभ्यासू व प्रगल्भ विचारधारा जोपासणारे शिक्षक आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना परिचित आहे. 

दादा तसे कणखर व चिवट, संघटनकुशल लढाऊ नेते होते. परंतु संघटनेत मतभेदाने वेगळ्या असलेल्या विरोधकांशीही त्यांचे सौहार्दाचे व आपुलकीचे नाते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शील व चारित्र्याची झालर होती. त्यामुळे कडव्या विरोधकांनाही ते आपलेसे वाटायचे. कार्यकर्त्यांशी वागताना त्यांच्यातील माणुसकीचा सतत प्रत्यय यायचा. ते महान नेते होते. तसेच कार्यकर्त्यांचे प्रेमळ मित्रही होते. स्वतः पदरमोड करून ते आपल्या चारचाकी वाहनाने बऱ्याच वेळा स्वतः वाहन चालवीत प्रवास करत. संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या कार्यासाठी त्यांची भ्रमंती असे. 

वेळोवेळी येणाऱ्या विधानपरिषदांच्या निवडणुकांमध्ये त्यांचेच मायक्रोप्लॅनिंग असे. निवडणुकीच्या काळात ते सलग ८ ते १० दिवस कार्यकर्त्यांसह प्रवास करीत असत. त्यात विद्यालयातील शिक्षकांच्या सभा, शिक्षक, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी तसेच समाज व राजकारणातील विविध नेते, संघटक व कायकर्ते ह्यांच्या गाठीभेटी ह्यातच त्यांचा वेळ कसा जायचा, हे कार्यकर्त्यांच्याही लक्षात यायचे नाही. जेथे जात तेथे दादांच्या भोवती मित्र, चाहत्यांचा गराडा असे. “आज माझ्याकडेच जेवण घेतले पाहिजे. तुमच्या सोबत असलेल्या दहा कार्यकर्त्यांची मी सोय केलेली आहे,असे प्रेमाचे व कळकळीचे आमंत्रण दादांना नाकारता येत नसे. होकार देताना मात्र ते म्हणायचे मला “साधी कांदा भाकरीसुद्धा चालेल.” मग तो कार्यकर्ता म्हणायचा, “दादा वाघ कुठे गवत खातो का ?” 

महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ.चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्या सुळे ह्यांनी कॉ. रेडकर, श्री. भालडे, श्री. शिवाजीराव पाटील, श्री. एन. जी. पाटकर, श्री. प्रकाशभाई मोहाडीकर, श्री. नाना पानसे ह्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी टी.डी.एफ.च्या माध्यमातून निकराचे लढे दिले. श्री. तात्या सुळेंनी आपल्या हयातीनंतर टी.डी.एफ.चा उत्तराधिकारी फक्त शिवाजीराव पाटीलच असतील असे हजारो टी.डी.एफ. कार्यकर्त्यांच्या समोर ठामपणे सांगितले किंबहुना ही जबाबदारी त्यांनी आत्ताच स्वीकारावी असे मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन करतो. त्यावेळेस दादांनी ‘तात्या जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हे पद आपणाकडेच रहावे’, अशी नम्र इच्छा व्यक्त केली. परंतु तात्यांच्या हयातीनंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मा. दादांना अध्यक्ष पदासाठी अर्ज भरावा लागला व टी.डी.एफ. अंतर्गत अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली व त्यात दादा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ह्या घटनेचे श्री. रावसाहेब आवारी, श्री. हनुमंतराव कुबडे, श्री. निवृत्ती करंडे, श्री. लक्ष्मणराव चतूर, श्री. हनुमंतराव भोसले, श्री. महादेव गव्हाणे, श्री. बाळासाहेब खानदेशे, श्री. भागवत सर व श्री. के. एस. ढोमसे हे साक्षीदार आहेत. 

नि:स्पृहपणा, नि:स्वार्थी वृत्ती हा दादांचा स्थायीभाव होता. संघटनेच्या आर्थिक व्यवहारामध्ये ते अत्यंत स्वच्छ, निर्लिप्त व पारदर्शी राहिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे शेकडो कार्यकर्ते तयार झाले व जणू काही दादा म्हणजे संघटनेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निर्मितीचा आदर्श कारखानाच होते. कायकर्त्यांमध्ये सचोटी, सेवाभावी वृत्ती, अखंड परिश्रमशीलता असावी हा त्यांचा आग्रह असायचा. दादांच्या कडक आणि कणखर धोरणामुळे काही वेळेला ते कार्यकर्त्यांची कडक शब्दात कानउघाडणी करायचे. अखंड परिश्रम, प्रयत्नातील सातत्य तसेच विजिगीषुवृत्ती ह्यामुळे त्यांचे सान्निध्य सदैव चैतन्यमय असेच असायचे. मरगळलेला कार्यकर्ता त्यांना सहन होत नसायचा. 

दादा टी.डी.एफ.चे अध्यक्ष असताना महाराष्ट्रात मुंबई विभाग वगळता सातपैकी सहा शिक्षक आमदार हे शिक्षक लोकशाही आघाडी (टी. डी. एफ.) चे होते. दादांच्या नेतृत्व काळात महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सहा आमदार टी.डी.एफ. चे होते. हा दादांच्या कारकिर्दीचा जणू सुवर्णकाळ होता. श्री. नाना बोरसे, श्री. गजेंद्र ऐनापुरे, श्री. व्ही. यू डायगव्हाणे, श्री. वसंतराव खोटरे, श्री. प. म. पाटील तसेच टी.डी.एफ. च्या माध्यमातून टी.डी.एफ. पुरस्कृत केलेले पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग) तसेच ठाणे विभागातून श्री. निरंजन डावखरे व पुणे विभागातून प्रा. शरद पाटील ह्यांना निवडून आणण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. हे यश म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली टी.डी.एफ. ची मोठी ताकद होती. वर उल्लेख केलेले आमदार यशस्वी होण्यासाठी दादांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. शिक्षकांचे व कार्यकर्त्यांचे विभागीय मेळावे, तालुका व जिल्हा मेळावे, शाळांमधील शिक्षकांच्या सभा, कधी कधी रात्री अपरात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन प्रचार करणे अशा गोष्टी सातत्याने कराव्या लागल्यामुळे ही यशप्राप्ती झाली. 

दादांच्या माध्यमिक शिक्षक संघटनेतील कुशल नेतृत्वामुळे जरी आमदारकी संपली तरी शिक्षकांची त्यांच्यावरील नितांत श्रद्धा व प्रेम ह्यामुळे त्यांना ह्या संघटनेतच काम करण्याचा आग्रह झाला. दादा सेवानिवृत्त झाले तरी संघटनेच्या कामाचा व्याप त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. संघटना व शिक्षकांसाठी आपल्या खाजगी जीवनाचा व कौटुंबिक जीवनाचा त्याग करून मिळणारी सर्व पेन्शन, पत्नीची पेन्शन पेट्रोलसाठी खर्च करून स्वतः ड्रायव्हिंग करीत अखरेच्या श्वासापर्यंत ते संघटनेचे कार्य करीत होते. 

टी.डी.एफ.च्या संस्थापकांपैकी दादा एक होते. आदरणीय मा. श्री. तात्या सुळे ह्यांनी कॉ. रेडकर, श्री. भालडे, श्री. शिवाजीराव पाटील, श्री. एन. जी. पाटकर, श्री. प्रकाशभाई मोहाडीकर, श्री. नाना पानसे यांच्या विचारातून टी. डी. एफ. ची पंचसूत्री शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम दादांनी केले. लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, नियोजन व स्वातंत्र्य ही पंचसुत्रे टी. डी. एफ. ची आहेत. सार्वजनिक जीवनात दादांनी प्रचंड काम केले. परंतु कधीही कोणत्याही प्रलोभनास, अमिषास बळी न पडता प्रचंड ताकदीने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी दादा नेहमी जागृत राहिले. बहुजन समाजातील शिक्षकांना संघटित करून त्यांच्यामध्ये नेतृत्वाची जाण निर्माण केली. अनेक शिक्षक कार्यकर्ते घडविले. श्री. तात्या सुळे महाराष्ट्र टी.डी.एफ. चे अध्यक्ष असताना श्री. शिवाजीराव पाटील कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते. 

दादांना आपल्या अंतःकाळाची जाणीव झाल्यामुळे की काय त्यांनी टी.डी.एफ. चे कार्य अखंड चालविण्यासाठी पुणे येथे महाराष्ट्र विद्यालयात एक महत्त्वाची बैठक १३ मे, २०१५ रोजी आयोजित केली. त्या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार श्री. विक्रम काळे, आमदार श्री. दत्तात्रय सावंत आणि श्री. के. एस. ढोमसे संघटनेचे महाराष्ट्र पातळीवरील माजी आमदार श्री. गजेंद्र ऐनापुरे, श्री. विजय बहाळकर, श्री. ज्ञानेशर कानडे, श्री. एस. डी. भिरुड, श्री. गजेंद्र लांडे, श्री. एस. डी. जमाले, श्री. हिरालाल पगडाल, श्री. हनुमतंराव भोसले, श्री. गणपतराव तावरे, श्री. राम पाटील, श्री. भारत घुले, श्री. सुरेश वाघमारे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. सदर बैठकीत टी.डी.एफ. च्या विचारांच्या जवळच्या संघटनांना व कार्यकर्त्यांना एकत्र आणून आपण प्रतिगामी शक्तींना समर्थपणे तोंड दिले पाहिजे व त्यासाठी आपण यापुढे सातत्याने प्रयत्नशील राहुया असे आवाहन केले. ही त्यांची शेवटची बैठक अंतर्मुख करणारी होती. टी. डी. एफ. चा विचार सदैव टिकलाच पाहिजे ही त्यांची आग्रहाची इच्छा होती. 

दादांना तालुका पातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांचा नावानिशी परिचय असायचा. तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य संघटना ह्यांच्यावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या कार्याचा आवाका फार मोठा होता. कार्यकर्त्यांना मुलाप्रमाणे जीव लावणाऱ्या आमच्या दादांची स्मृती अखंड शैक्षणिक विश्वामध्ये राहील. 

दादांनी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेला सदैव उत्तम मार्गदर्शन करून संघटनेमध्ये अधिक बळकटी आणली. दादांच्या निधनानंतर श्री. के. एस. ढोमसे ह्यांनी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून आयोजित केलेल्या कार्यकारिणीच्या सभेत दादांच्या संघटनात्मक कार्याची स्मृती चिरंतन स्मरणात रहावी या उद्देशाने महाराष्ट्रातील टी.डी.एफ. च्या आदर्श कार्यकर्त्याला दादांच्या नावाने ‘शिवाजीराव पाटील पुरस्कार’ देण्याचा ठराव संमत करण्यात आला. पुरस्कार निवड समितीने ह्या पहिल्यांदाच देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी के. एस. ढोमसे ह्यांचे नाव एकमताने जाहीर केले. सदर पुरस्कार वितरण सोहळा शिरूर येथे मयुरी मंगल कार्यालयात आयोजित करुन पदवीधर आमदार मा. निरंजन डावखरे ह्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमप्रसंगी दादांच्या सुविद्य पत्नी डॉ. लीलाताई पाटील, चि. उदयराव पाटील व सौ. छायाताई पाटील उपस्थित होते. तसेच आमदार मा. बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. प्रदीपदादा कंद, (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा. कांतिलाल उमाप इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 

अखेरचे पर्व 

दादांचे विचार पुरोगामी होते. ते केवळ प्राचार्य नव्हते तर एक समाजसुधारक होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. उत्तम प्रशासक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, खंबीर नेतृत्व आणि उत्तम जनसंपर्क यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते प्रभावीपणे वावरले. त्यांनी तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा त्यांच्या जीवनावर विलक्षण प्रभाव होता. विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांनी राजकारणाला समाजकारणाचे अधिष्ठान दिले. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना खूप आनंद होत असे. आमदार असतानाही त्यांनी कोणत्या पदाचा लाभ स्वतःला, स्वतःचे कुटुंब (मुलगा) आणि नातेवाईकांना होऊ दिला नाही. निःस्वार्थी जीवनाचा आदर्श त्यांच्या कृतिउक्तीचा धर्म झाला होता. 

दादांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य समाजसेवा व आपल्या चाहत्यांच्या जनसंपर्कात गेले. आंबेगाव तालुक्यात लग्नपत्रिका छापायच्या म्हणजे त्यात प्रमुख उपस्थिती हा एक उल्लेख असणारच. त्यात आजीमाजी खासदार, आमदार व इतर मान्यवरांची नावे असणारच. अर्थात त्यामध्ये दादांचे नावही असायचे. ते शिस्तीचे पक्के. एकाच दिवशी त्यांना ८ ते १० कार्यक्रम असायचे. मग आदल्या दिवशीच झोपायच्या अगोदर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांची यादी अतिशय लहान पण सुवाच्च अक्षरात ते कागदावर तयार ठेवायचे. मग २ ते ३ साखरपुड्यांना उपस्थिती लावायची व ज्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पोहचू शकले नाहीत, अशांच्या लग्नाला ते उपस्थित राहत. साखरपुड्याची वेळ सगळ्या पत्रिकांवर सकाळी ९ ते ११ असायची. विवाहमुहूर्त मात्र वेगवेगळे असायचे. साखरपुड्याला ते सकाळी ९ वाजता हजर व्हायचे पण तेथे वऱ्हाडी मंडळींचाच पत्ता नसायचा मग ते तो कार्यक्रम सोडून दुसऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. लग्नसराईमध्येही हे असेच चालत असायचे. लोकांना वेळेचे महत्त्व नसायचे पण शिवाजीराव पाटील मात्र आयुष्यभर वेळेवर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा शिरस्ता पाळत आले. 

वयाची ८० वर्षे पार केल्यानंतर स्वतः गाडी चालवत त्यांचा हा जनसंपर्क चालूच असायचा. आपल्या न जाण्यामुळे एखाद्याला वाईट वाटू नये ह्याची काळजी ते आयुष्यभर घेत आले. मग तो कार्यक्रम छोटा असो की मोठा असो. मोठ्या माणसाचा असो की शिपायाच्या मुलाचा वाढदिवस असो ते उपस्थित राहणारच. दादा हिशोबाचेही पक्के होते. त्यांच्याकडे पैशाची रेलचेल कधीच नव्हती. परंतु आहे त्या पगारामध्ये त्यांनी योग्यप्रकारे नियोजन करून सर्व जबाबदाऱ्या यथोचित पार पाडल्या. संपूर्ण आयुष्यात जे काही केले ते स्वबळावरच. मोठमोठ्या भेटवस्तू त्यांना कधीच आवडत नसत. किंबहुना त्यांना कोणी एखादी भेटवस्तू देणे हेच मुळी आवडत नसायचे. एरवी पुढारी लोकांना जेवढ्या भेटवस्तू मिळतील तेवढ्या हव्याच असतात व त्यात त्यांना मोठेपणाही वाटतो. भेटवस्तू स्वीकारणे आपला हक्क आहे व देणे हे जनतेचे कर्तव्य आहे अशीच बहुतांशी पुढाऱ्यांची धारणा असते. दादा मात्र ह्या सर्वांहून वेगळे होते. प्रसंगानुसार भेटवस्तू स्वीकारावी लागलीच तर त्याची नोंद ते ठेवायचे व योग्य निमित्त शोधून त्याची परतफेड ते आवर्जून करायचे. हे शक्य व्हावे म्हणून त्यांना आपल्या आवाक्याबाहेरच्या भेटवस्तू की ज्यांची ते परतफेड करू शकणार नाहीत त्या त्यांना आवडत नसत. 

मांसाहरी भोजन हा त्यांचा आवडता विषय असायचा. इतरांसारखे सोमवार, गुरुवार पाळणाऱ्यातले ते नव्हते. त्यामुळे दररोज नॉन-व्हेज खायची त्यांची तयारी असायची. त्याला ते वाघाचे खाणे म्हणायचे. मात्र त्यांचा आहार मर्यादित असायचा. समोर ताट आले की त्यातले आवश्यक तेवढेच ठेवून उर्वरित पदार्थ जेवायला सुरुवात करण्याअगोदर काढून ठेवत. आवडीचे जेवण आहे म्हणून ते कधीही जास्त आहार घेत नसत. त्यांच्या उत्तम आरोग्याचे हेच तर एक गुपित होते. 

दादांची उत्तम प्रकृत्ती हे त्यांचे मोठे भांडवल होते. त्यांनी उभ्या आयुष्यात कधी इंजेक्शन घेतलेले किंवा डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्याचे त्यांच्या घरातील व निकटवर्ती ह्यांनाही पहावयास मिळाले नाही. त्यांना कधी सर्दी झाली नाही की पोटात गडबड आहे, ताप आहे अशी तक्रार संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी केली नाही. त्यांचे उपचारही घरगुतीच असायचे. नॉन-व्हेज खाल्ले की ते गुळाचा खडा आवर्जून मागवून घेणार व खाणार. कधी कधी लसणाची पाकळीही खाणार. त्यामुळे त्यांना कधी औषधे लागली नाहीत. 

दिनांक ८ जून, २०१५ रोजी नेहमीप्रमाणे अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम आणि प्रासंगिक भेटीगाठी, चर्चा, बैठका दादांनी पार पाडल्या. शेवटची बैठक म्हणून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाची स्थानिक व्यवस्थापन समितीची बैठक दुपारी ४ वाजता पार पडली आणि नेहमीप्रमाणे स्वतः गाडी चालवत पुण्याला काही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री दादा पुन्हा स्वतः गाडी चालवत मंचरला स्वगृही परतले. रात्रीचे भोजन उरकल्यावर दादांनी वर्तमानपत्राचे वाचन केले. प्रवासाच्या दगदगीने डोके दुखल्याची जाणीव होत असल्याने किरकोळ औषधोपचार केले. वर्तमानपत्राची सुव्यवस्थित घडी घातली. डाव्या कुशीवर हात डोक्याखाली घेऊन नेहमीच्या सवयीनुसार शांत झोपी गेले. 

९ जून, २०१५ सूर्य उगवला परंतु दादा झोपेतून उठलेच नाहीत. ती चिरनिद्रा होती. एका कर्मयोग्याने जगाचा निरोप घेतला. एका निरोगी, निरुपद्रवी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शेवट त्यांच्या स्वभावाला साजेशा पद्धतीने झाला होता. झोपेतच मृत्यूने त्यांना गाठले होते. डॉक्टर नाही, हॉस्पिटल नाही, औषधे नाही, हॉस्पिटलला भेटायला येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी नाही हे सर्व त्यांना सहनही झाले नसते. तो त्यांचा स्वभावही नव्हता. नियतीने त्यांच्या प्रामाणिकपणाची, कर्तृत्वाची, निष्ठेची दिलेली सुलभ मृत्यूरूपी अप्रतिम भेट त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी होती. दादा गेले. असंख्य नातेवाईक, सगेसोयरे, मित्रमंडळी, रयत सेवक विद्यार्थी आणि शिक्षक शोकसागरात लोटले गेले. परंतु दादांचे अचानक आणि विलक्षण पद्धतीने जाणेही आश्चर्यकारक होते. हजारो विद्यार्थी घडविणारा, कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या अपरंपार निष्ठेपायी असीम कर्तृत्वाची बहुआयामी क्षमता असूनही शिक्षकीपेशा स्वीकारून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोनं करणारा एक परिस हरपला. एक सरळमार्गी सच्छिल, प्रामाणिक, विद्वान, बहुजनांचा आधार असे दैवदुर्मिळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. संत महात्म्यांचे जीवनही त्यांच्यापेक्षा वेगळे नव्हते. फक्त वेष वेगळा होता, अंतरंग महात्म्याचेच होते. हे अनेकांना कळलेले नाही. एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणे हे सामान्यांचे काम नव्हे. ज्यांना ते कळले अशी मोजकीच मंडळी हयात आहेत. 

“मार्गाधार वर्तावे । विश्व हे माहेर लावावे ।। 

| अलौकिक नोहावे। लोकांप्रति ।। ” 

(ज्ञानेश्वरी ३/१७१) 

अशी त्यांची जीवन जगण्याची अभिनव रीत होती. त्यांच्या जीवनात ज्ञानसूर्याचे तेज होते. मोगऱ्याचा सुगंध होता. चंदनाची शीतलता आणि चांदण्याची शुभ्रता होती. वक्तृत्व आणि कर्तृत्वाची त्यांच्या जीवनाशी एकरूपता होती. म्हणून दादांचे ‘एक कर्मयोगी’ अशा शब्दातच वर्णन करावे लागेल. 

शब्दांकन संपादक मंडळ, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, प्रा. वसंत भालेराव मंचर

]]>
https://durgdemoweb.in/docs/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d/feed/ 0
संपादकीय https://durgdemoweb.in/docs/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/ https://durgdemoweb.in/docs/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/#respond Sat, 16 May 2026 08:58:47 +0000 https://durgdemoweb.in/?post_type=docs&p=403 संपादकीय 

८ जूनची ती काळरात्र संपताच सकाळी (९ जून) फोन आला. “दादा गेले”. “कशाने ?” “कळलेच नाही.” “पण सध्या ते आजारी होते का?” कारण आजारी असले किंवा प्रकृत्ती चिंताजनक असेल तर किमान मनाची तयारी तरी असते. हा ‘कर्मयोगी’ असा एकाएकी कसा काळाच्या पडद्याआड गेला ? हे तर कर्मयोग्याचं जाणं! 

माझ्यावर मोठा आघातच झाला. अशा वेळी मदतीला धावून आले ते ग. दि. माडगुळकरांचे शब्द… 

“मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा, 

दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 

दादांवर प्रेम करणाऱ्यांचं सांत्वन करता आले तर एवढ्या शब्दानेच करता आलं असतं. दादांच्या आठवणींनी दचकायलाच झालं. मोठ्या काळाचा स्नेहबंध. त्यामुळे घरातील कुणीतरी दुरावल्याची बेचैनी मनावर आली. थोडा वेळ सुन्न बसून राहिलो. पण शेवटचे भेटायला हवे, या विचाराने उठलो आणि गाडी घेऊन तडक ‘शिवनेरी’ बंगल्यात पोहोचलो. तो पोहोचण्याचा छोटा काळही मोठा भासत होता. बंगल्यात गेलो तर दादा शांत, प्रसन्न चेहऱ्याने ‘चिरविश्रांती’ घेत होते. पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता पण आज होत असलेल्या आमच्या गाठीभेटीत प्रथमच दादांकडून नेहमीचे स्वागत करणे घडत नव्हते. बंगल्यात मोठी गर्दी असूनही हालचाली मंदावलेल्या, संपूर्ण वातावरण जडपणाने भारलेलं. कोणी कोणाशी बोलत नाही. सारं कसं निःशब्द… साश्रुपूर्ण… 

अश्रूंनी डबडबलेल्या आणि भावनांनी उचंबळून आलेल्या माझ्या हृदयात त्याप्रसंगी अनेक चलचित्रे आणि गत आठवणींचे डोंगर उभे राहिले. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, अत्यंत तत्त्वदर्शी, कडक शिस्तीचे शिक्षक, प्राचार्य ते सेवाव्रती आमदार आणि त्याहीपेक्षा माझ्यासारख्या अनेकांना अर्थपूर्ण जगणं शिकविणारे एक मार्गदर्शक आधारवड. समोर शरपंजरी पडलेल्या भिष्मासारखे महान भासू लागले. त्यांचं कार्य-कर्तृत्व, राजकारण, समाजकारण समोर दिसू लागले. उभी हयात स्वाभिमानाने वावरणारे आणि शिक्षण तसेच लोककार्यासाठी समर्पित जीवन जगून अन्याय, गुलामी लाथाडणारे त्यांचे विचार विजेसारखे मनात चमकू लागले. त्यांनी घडविलेल्या, अनेक ज्ञानक्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या समाजधुरिणांची मांदियाळीच डोळ्यांसमोर तरळू लागली आणि त्याचबरोबर एवढं मोठं डोंगराएवढं काम उभं करणाऱ्या शिक्षणमहर्षी, सेवाव्रती कर्मवीरांच्या प्रतीरुपाचा, क्रांतीचा विचार प्रेरणेच्या रुपाने येणाऱ्या नव्या भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असं एक मन दुसऱ्या मनाला आर्जव, हट्ट करु लागले आणि त्याच वेळी दादांवर स्मृतिग्रंथ निर्मितीची कल्पना सुचली. 

मरणोपरांत इतर क्रियाकर्मे आटोपल्यानंतर दादांच्या सहकारी, स्नेही, विद्यार्थी, मान्यवर आणि कुटुंबीयांसमोर एकत्रितपणे स्मृतिग्रंथ निर्मितीचा विचार ठेवून सर्वांच्या प्रांजळ संमतीने स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्याचा एकमुखी निर्णय घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने आम्ही दादांच्या संपर्कातील राजकारणी, नेतेमंडळी, आमदार, खासदार, सहकारी, स्नेही, विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांना भेटू लागलो, तसा तसा दादांचा मोठेपणा आभाळाला भिडू लागला. कुठेतरी या साऱ्यांचा मनातून हेवा वाटू लागला. कारण या सर्वांना दादांचा सहवास उदंड लाभला होता. खरंच खूप सुदैवी होती ही मंडळी ! एका धिरोदत्त तत्त्वज्ञानी… तरीही राजकारणी, समाजकारणी आणि एका शिक्षण धुरिणाचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून दादा नावाचा गुलामीची, कर्मकांडाची ऐतिहासिक विकृतीची चिरफाड करणारा नायक समोर येऊ लागला; समाज जागृत करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष समोर येऊ लागला. बुद्ध, चार्वाक, महावीर ते शिव-शाहू, फुले, आंबेडकरांचा पदपथ लक्षात येऊ लागला. 

हजारो वर्षांपासून या देशात सांस्कृतिक संघर्ष चालू आहे. त्या काळात येथील मूळ लोकसंस्कृती नष्ट करुन गुलामी लादण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याविरुद्ध बुद्धापासून छत्रपती शिवरायांपर्यंत सर्वांनी आपले जीवन संघर्ष करुन संपविले आहे. या महापुरुषानंतर त्यांचे वंशज पुन्हा गुलामगिरीकडे गेले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना समजाऊन न घेणे. ज्यांच्यासाठी संघर्ष करावा तिच माणसे नादान निघतात. जिवंतपणी अहंकारातून विरोध करतात. त्यांच्यासाठी महामानवाचे ‘तीळ तीळ तुटणे’ व ‘लाभावीण प्रीती’ करणे त्यांना कळत नाही. पुन्हा पुतळा संस्कृतीचा, उत्सव, जयंत्या – मयंत्याचा उगम होतो, परंतु तेव्हा वेळ गेलेली असते. महापुरुषांना जिवंतपणे न स्वीकारणे हा येथील मराठा व बहुजन समाजाचा मोठा दुर्गुण आहे. त्यामुळे क्रांत्या असफल झाल्या आहेत. पुन्हा पुन्हा गुलामीकडे बहुजन समाजाची वाटचाल झाली आहे. यातून पुढे नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, दादांच्या कार्यकर्तृत्वातून क्रांतिकारी पदपथ निर्माण होऊन पथदर्शी पिढीचं निर्माण व्हावं. स्वराज्य-सुराज्य-शिवराज्य – शिवराष्ट्राच्या कल्पनांना बळ यावं यासाठी ‘कर्मयोगी आमदार शिवाजीराव पाटील’ हा प्रस्तुत स्मृतिग्रंथ प्रकाशित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. 

दादांवर आधारीत स्मृतिग्रंथाचं संपादन होतंय, असं समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून लेखांचा प्रचंड पाऊस पडला. आम्ही केलेले नियोजन व पानांची मर्यादा यामुळे सर्वच लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करणे शक्य नव्हते. तसेच ग्रंथाचे काम पूर्ण झाल्यावरही काही मान्यवरांचे लेख मिळाले. वेळेअभावी त्यांचा समावेश यात करता आला नाही याचे शल्य राहिले. दादांच्या राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञानी, शिक्षक, प्राचार्य या ओळखीबरोबरही दादांची कौटुंबिक, पार्श्वभूमी माहित व्हावी म्हणून त्यांचे कौटुंबिक लेखही या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे वाचकांची जिज्ञासापूर्ती होईल, यात शंका नाही. शब्दमर्यादांच्या पलीकडचे ‘दादा’ हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनातील शेकडो पैलूंवर लेखन करता येईल. त्यांच्या एकंदर जीवनातील हा एक टक्काही भाग नाही, याची नम्र जाणीव आम्हाला आहे. 

या स्मृतिग्रंथासाठी लेख पाठविणाऱ्यांचे सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! ग्रंथातील लेख व आशयाचे पुनरावलोकन, संस्करण, शुद्धलेखन आणि साहित्यमूल्य यासाठी मेहनत घेणारे बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापक, मा. बळीराम आवटेसाहेब, यांना धन्यवाद देतो, त्यांना सहायक म्हणून काम केलेले डॉ. ज्ञानेश्वर थोरात, संत साहित्याचे अभ्यासक यांनाही मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि संपादकीय मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद प्रकट करतो. 

प्रस्तुत ग्रंथसंपादनाला संमती देऊन सर्व प्रकारचे सहकार्य करणारे श्री. उदय शिवाजीराव पाटील, चि. रणजित, आई व सौ. छाया वहिनी यांचे आभार प्रकट करणे परकेपणाचे होईल. म्हणून त्यांच्या ऋणातच राहणे आत्मनंदाचे होईल. 

प्रस्तुत स्मृतिग्रंथ संपादनाचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून दिलेले निरलस प्रेम व स्वातंत्र्याने माझा सन्मान वाढविल्याने मी संपादकीय मंडळाचा मनःपूर्वक कृतज्ञ आहे. 

प्रस्तुत स्मृतिग्रंथाने नवी पिढी क्रांतिकार्यासाठी चेतावी, सत्यासाठी, समृद्ध, मानवतावादी, शिवराज्याच्या निर्माणासाठी सिद्ध व्हावी व दादा त्यांचेसाठी कायम प्रेरणादायक राहतील, असा विश्वास वाटतो. कविवर्य नारायण सुर्वेच्या शब्दांत दादांचे प्रतिबिंब दिसते… 

“झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते, 

अशी आमंत्रणे आम्हालाही आलीत, नाहीच असे नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असे नाही. 

शास्त्राने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे 

आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप, नाहीत असे नाही. अरे इमान विकत घेणारी दुकाने पाड्या पाड्यावर, डोकी गहाण टाकणारे महाभाग, नाहीत असेही नाही. अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना, 

विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही. ‘ 

।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय. ।। 

ॲड. सुनील मा. बांगर 

(शिवचरित्र अभ्यासक), संस्थापक/अध्यक्ष-राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

]]>
https://durgdemoweb.in/docs/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/feed/ 0